Judges 9

1यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाईकांजवळ जाऊन त्यास आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हटले, 2तुम्ही कृपाकरून शखेमांतल्या सर्व माणसास सांगा म्हणजे ते ऐकतील, यरूब्बालाच्या सर्व सत्तर मुलांनी तुम्हांवर राज्य करावे किंवा एका मुलाने तुम्हांवर राज्य करावे? यांतून तुम्हाला कोणते चांगले वाटते? मी तुमच्या हाडाचा व मांसाचा आहे याची आठवण करा.

3तेव्हा त्याच्या आईचे नातेवाईक त्याच्याविषयी शखेमांतल्या सर्व माणसांशी बोलले, आणि त्यांनी अबीमलेखास अनुसरण्याचे मान्य केले, कारण त्यांनी म्हटले, तो आमचा भाऊ आहे. 4त्यांनी त्याला बाल-बरीथाच्या घरातून सत्तर शेकेल रुपे दिले, आणि अबीमलेखाने बेकायदेशीर व बेदरकार स्वभावाची माणसे भाडयाने ठेवली. यास्तव ती त्याच्यामागे चालली.

5तो अफ्रास आपल्या बापाच्या घरी गेला, आणि त्याने आपले भाऊ म्हणजे यरूब्बालाचे सत्तर मुले एका दगडावर मारले; तरी यरूब्बालाचा धाकटा पुत्र योथाम राहिला, कारण तो लपलेला होता. 6मग शखेमांतली सर्व पुढारी व बेथ मिल्लोतल्या सर्वांनी मिळून जाऊन शखेमामधल्या एलोन खांबाजवळ अबीमलेखाला राजा करून घेतले.

7नंतर लोकांनी योथामाला हे कळविले, तेव्हा तो गरिज्जीम डोंगराच्या शिखरावर जाऊन उभा राहिला. त्याने आपला स्वर उंच केला आणि त्यांना बोलला, शखेमाच्या पुढाऱ्यांनो, देवाने तुमचे ऐकावे म्हणून तुम्ही माझे ऐका. 8झाडे आपल्यावर अभिषेकाने राजा करायास निघाली; तेव्हा त्यांनी जैतूनाला म्हटले, तू आमचा राजा हो.

9तेव्हा जैतूनाने त्यास म्हटले, झाडांवर अधिकार करायास जावे म्हणून, ज्याने देवाचा व माणसाचा सन्मान करीतात, ते माझे तेल मी सोडून देऊ काय? 10नंतर त्या झाडांनी अंजिराला म्हटले तू चल, आमचा राजा हो. 11तेव्हा अंजिराने त्यास म्हटले, मी आपली गोडी व आपले चांगले फळ सोडून, झाडांवर अधिकार कारायास जावे की काय?

12नंतर त्या झाडानी द्राक्षवेलाला म्हटले, तू चल, आमचा राजा हो. 13तेव्हा द्राक्षवेलाने त्यास म्हटले, मी आपला ताजा रस जो देवाला व मनुष्यांस संतुष्ट करतो, तो सोडून झाडावर अधिकार करायास जावे की काय? 14नंतर त्या सर्व झाडानी काटेरी झुडुपाला म्हटले, तू चल, आमचा राजा हो.

15तेव्हा काटेरी झुडुपाने त्या झाडांस म्हटले, जर तुम्ही खरेपणाने मला अभिषेक करून राजा करीत असाल, तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या; नाहीतर काटेरी झुडुपातून विस्तव निघून लबानोनावरल्या गंधसरूस जाळून टाकील. 16यास्तव आता तुम्ही विचार करा की, खरेपणाने व प्रामाणिकपणाने वर्तणूक करून अबीमलेख राजा केले, आणि यरूब्बालासंबंधी आणि त्याच्या घराण्यासंबंधी जर तुम्ही बरे केले का आणि त्याच्या हातांच्या कृत्यांनुसार त्याला शिक्षा केली आहे काय?

17आणि विचार करा की, माझ्या बापाने तुमच्यासाठी लढाई केली, आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला मिद्यानाच्या हातातून सोडवले आहे. 18परंतु तुम्ही आज माझ्या बापाच्या घरावर उठला, आणि त्याचे पुत्र सत्तर माणसे, यांस तुम्ही एका शिळेवर जिवे मारले, आणि त्याच्या दासीचा पुत्र अबीमलेख याला शखेमांतल्या माणसांवर राजा करून ठेवले, कारण तो तुमचा भाऊ आहे.

19तर तुम्ही आजच्या दिवशी यरूब्बालाविषयी व त्याच्या घराण्याविषयी खरेपणाने व प्रामाणिकपणाने जर वर्तणूक केली असेल, तर अबीमलेखामध्ये संतोष करा; त्यानेही तुम्हामध्ये संतोष करावा. 20परंतु जर तसे नाही, तर अबीमलेखांतून विस्तव निघून शखेमांतील व मिल्लोतील माणसांस जाळून टाको, आणि शखेमातल्या व मिल्लोतील माणसांतून विस्तव निघून अबीमलेखाला जाळून टाको. 21नंतर योथाम पळून गेला व आपला भाऊ अबीमलेख ह्याच्या भीती पोटी तो बैर येथे जाऊन राहिला.

22तेव्हा अबीमलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केले. 23नंतर देवाने अबीमलेख व शखेमांतली माणसे यांमध्ये दुष्ट आत्मा पाठवला, यास्तव शखेमांतल्या माणसानी अबीमलेखाशी कपटाने वागु लागले; 24देवाने हे केले यासाठी की, यरूब्बालाच्या सत्तर पुत्रांच्या विरोधात केलेल्या हिंकाचाराचा बदला घ्यावा, व त्यांच्या रक्तपाताबद्दल त्यांचा भाऊ अबीमलेख दोषी ठरवला जावा; आणि त्याच्या भावांचा खून करण्यात त्याला मदत केली म्हणून, शखेमांतल्या माणसेही जबाबदार धरली जावीत.

25नंतर शखेमातल्या माणसानी त्याच्यासाठी डोंगरांच्या शिखरावर दबा धरणारे ठेवले, आणि त्यांनी आपल्याजवळून जो कोणी वाटेवर चालला, त्याला लुटले. हे कोणीतरी अबीमलेखाला सांगितले.

26मग एबेदाचा पुत्र गाल आपल्या भावांसहीत आला, आणि ते शखेमात आल्यानंतर शखेमांतल्या माणसानी त्याच्यावर विश्वास ठेविला. 27तेव्हा त्यांनी शेतात जाऊन आपल्या द्राक्षमळ्यांची खुडणी करून द्राक्षांचा रस काढला आणि ते उत्साह करीत आपल्या देवाच्या घरात गेले, आणि तेथे खाऊन पिऊन त्यांनी अबीमलेखाला शाप दिला.

28तेव्हा एबेदाचा पुत्र गाल बोलला, अबीमलेख कोण आहे की आम्ही त्याचे दास असावे? यरूब्बालाचा मुलगा व त्याचा कारभारी जबुल हे शखेमाचा बाप हमोर यांच्या कुळांतील लोकांचे दास असतील पण आम्ही अबीमलेखाची सेवा का करावी? 29आणि हे लोक माझ्या हाती असते तर किती बरे होते! म्हणजे मी अबीमलेखाला काढून टाकले असते. मी अबीमलेखाला म्हणेन, तू आपले सैन्य बाहेर बोलाव.

30त्या वेळेस त्या नगराचा अधिकारी जबुल याने, एबेदाचा पुत्र गाल याच्या गोष्टी ऐकल्या, आणि त्याचा राग पेटला. 31मग त्याने कपट करून अबीमलेखाजवळ दूत पाठवून असे सांगितले की, पाहा, एबेदाचा पुत्र गाला आपल्या भावांसोबत शखेमास आला आहे; आणि पाहा, ते तुझ्याविरूद्ध नगराला चिथावणी देत आहेत.

32तर आता, तू आपल्या जवळच्या लोकांसहीत रात्री उठून शेतात दबा धर. 33मग असे व्हावे की, सकाळी सूर्य उगवताच तू उठून नगरावर हल्ला करा; मग पाहा, तो आपल्या जवळच्या लोकांसुध्दा तुझ्याजवळ बाहेर येईल, तेव्हा जसे तुझ्या हाती येईल तसे तू त्याचे कर.

34यास्तव अबीमलेखाने आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत रात्री उठून चार टोळ्या करून शखेमावर दबा धरला. 35मग एबेदाचा पुत्र गाल, बाहेर येऊन नगराच्या वेशीजवळ उभा राहिला, आणि अबीमलेख आपल्याजवळच्या लोकांसोबत दबा सोडून उठला.

36तेव्हा गालाने त्या लोकांस पाहून जबुलाला म्हटले, पाहा, लोक डोंगरांच्या शिखरांवरून उतरतात. मग जबुल त्यास बोलला, तुला डोंगराची छाया मनुष्यांसारखी दिसते. 37तेव्हा गालाने फिरून असे म्हटले की, पाहा, देशाच्या उंचवटयावरून लोक उतरतात; आणि एक टोळी एलोन मौननीमाच्या वाटेवरून येत आहे.

38मग जबुल त्याला बोलला, तू आपल्या ज्या तोंडाने बोललास, अबीमलेख कोण की, आम्ही त्याची चाकरी करावी ते आता कोठे आहे? ज्या लोकांस तू तुच्छ केले, ते हेच की नाहीत? आता मी म्हणतो, तू बाहेर जाऊन त्यांच्याशी लढाई कर. 39मग गालाने शखेमांतल्या माणसांपुढे होऊन, बाहेर जाऊन अबीमलेखाशी लढाई केली. 40तेव्हा अबीमलेख त्याच्या पाठीस लागला असता तो त्याच्यापुढून पळाला, आणि वेशीच्या दारापर्यंत बहुत लोक जखमी होऊन पडले.

41मग अबीमलेख आरूम्यात राहिला, आणि गालाने व त्याच्या भावांनी शखेमांत न राहावे म्हणून जबुलाने त्यास घालवले. 42नंतर पुढल्या दिवशी असे झाले की लोक बाहेरल्या शेतांत गेले, आणि हे अबीमलेखाला कोणीतरी सांगितले; 43तेव्हा त्याने लोक मिळवून त्यांच्या तीन टोळ्या केल्या; मग शेतात दबा धरला, आणि त्याने न्याहाळले; तर पाहा लोक नगरांतून बाहेर आले होते, तेव्हा त्याने त्यावर चाल करून त्यास मारले.

44त्या वेळेस अबीमलेख आणि त्याच्या सोबतची जी टोळी, ती घाला घालून नगराच्या वेशीजवळ उभी राहिली, आणि दुसऱ्या दोन टोळ्यानी शेतात जे सर्व, त्यांवर घाला घालून त्यास मारले. 45अबीमलेखाने तर त्या सगळ्या दिवसांत नगराशी लढाई केली, आणि त्याने नगर घेतले व त्यांत, जे लोक होते त्यास जिवे मारले, आणि नगर उध्वस्त करून त्यावर मीठ पेरून टाकले.

46तेव्हा शखेमाच्या बुरूजांतल्या सर्व हे माणसानी ऐकले, आणि ते बरीथ देवाच्या घराच्या बुरूजात गेली. 47मग शखेमाच्या बुरूजातली सर्व माणसे एकवट झाली आहेत, असे अबीमलेखाला कोणी सांगितले.

48तेव्हा अबीमलेख आपल्याजवळच्या सर्व लोकांसहीत सलमोन डोंगरावर गेला, आणि अबीमलेखाने आपल्या हाती कुऱ्हाड घेऊन झाडाची फांदी तोडली, मग तिला आपल्या खांद्दावर उचलून घेऊन त्याने आपल्या जवळच्या लोकांस सांगितले, जे मी केले ते तुम्ही पाहिले, तसे माझ्यासारखे लवकर करा. 49तेव्हा सर्व लोकांतल्या एकएकाने फांदी तोडून घेतली, आणि ते अबीमलेखाच्यामागे चालले; मग त्यांनी, त्या फांद्या बुरुजाला लावल्या व ते लोक आत असता बुरूजाला आग लावली; अशी शखेमाच्या बुरुजातली सर्व पुरुष व स्त्रिया सुमारे एक हजार इतकी मेली.

50नंतर अबीमलेख तेबेसास गेला, आणि त्याने तेबेजावर तळ देऊन ते घेतले. 51परंतु त्या नगरात एक मजबूत बुरूज होता, आणि सर्व पुरुष स्त्रियांसुध्दा म्हणजे त्या नगरांतली सर्व माणसे त्यांत पळून गेली आणि आपल्यामागे दरवाजा बंद करून बुरूजाच्या धाब्यावर चढले.

52नंतर अबीमलेख त्या बुरूजाजवळ आला आणि त्याच्याविरूद्ध लढला, आणि बुरूजाला आग लावून जाळावयास त्याच्या दाराजवळ गेला. 53तेव्हा एका स्रीने अबीमलेखाची टाळू फोडण्यास त्याच्या डोक्यावर जात्याची वरची तळी टाकतो. 54तेव्हा त्याने घाई करून आपला हत्यारे वाहणारा जो तरुण त्याला हाक मारून सांगितले, तू आपली तरवार काढून मला जिवे मार, नाहीतर मजविषयी म्हणतील की बाईने त्याला मारले. यास्तव त्याच्या तरूणाने त्याला भोसकल्यावर तो मेला.

55मग अबीमलेख मेला हे पाहून इस्राएली माणसे आपापल्या ठिकाणी गेली. 56तर अबीमलेखाने जी दुष्टाई आपल्या सत्तर भावांस जिवे मारण्याने आपल्या पित्याविषयी केली होती, तिचा देवाने त्याच्यावर सूड घेतला. आणि शखेमांतल्या माणसांचीही सर्व दुष्टाई देवाने त्यांच्या मस्तकावर उलटून लावली; याप्रमाणे यरूब्बालाचा पुत्र योथाम याचा शाप त्यास भोवला.

57

Copyright information for MarULB